नांदेड :
ग्रामीण भागातील पात्र व अपात्र कुटुंबे शौचालयाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करुन गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी सरपंचांनी मदत करावी या आशयाचे पत्र राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांनी दिले आहेत. या पत्राचे वितरण जिल्हयात सुरु करण्यात आले आहे.
पत्र वितरणाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आणि शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे यांनी पुढाकार घेतला आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सदर पत्राचे तालुक्यातील सरपंचांना वितरीत करण्यात आले.
पायाभूत सर्वेक्षणानुसार राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी सरपंचांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या सक्रिय पुढाकारातून ग्रामीण जनतेचे अस्वच्छतेमुळे होणा-या हाल अपेष्टा, कुचंबणा थांबवायला मोठी मदत झाली आहे. गावस्तरावर जे कुटूंब अद्यापही बिगर शौचालयाची असतील तर यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन अशा कुटूंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करुन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर माहिती प्रणालीमध्ये नोंद करावी असे आवाहन या पत्राव्दारे करण्यात आले आहे. पंचायत समितीस्तरावर सदर पत्र पाठविण्यात आले असून गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी सरपंचांना पत्र वाटप करुन त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हयातील सर्व सन्माननिय सरपंचांनी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होऊन वैयक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण केल्यास गावस्तरावर शाश्वत स्वच्छता राखण्यास मदत होईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment