आदिवासींच्या नवक्रांतीचा जनक महाननायक "शहीद बिरसा मुंडा " -उत्तम कानिंदे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 15, 2021

आदिवासींच्या नवक्रांतीचा जनक महाननायक "शहीद बिरसा मुंडा " -उत्तम कानिंदे

 



आदिवासींच्या नवक्रांतीचा जनक  महाननायक "शहीद बिरसा मुंडा " -उत्तम कानिंदे

    

' आदिवासींच्या आत्मसन्मानाची चळवळ उभी करून मानवमुक्तीचा लढा उभारणारे महान नायक शहीद " बिरसा मुंडा " यांचा १५ नोव्हेंबर जन्म दिवस. यानिमित्त त्यांच्या क्रांतीकारी आंदोलनाची ओळख करून देणारा ' उत्तम कानिंदे ' यांचा लेख '


          निसर्गातील तत्वे, नियम जीवनसृष्टीशी एकरूप होऊन ज्या आदिवासी समाजाने स्वतःची जीवनमूल्ये ठरवली, सामाजिक व सांस्कृतिक संबंध निश्चित केले. अनैसर्गिक भेदभावाच्या वातावरणापासून अलिप्त राहिले त्यांना इथल्या प्रस्थापितांनी तर छ्ळलेच परंतु ' ईस्ट इंडिया कंपनी ' च्या माध्यमातून आपली पाळेमुळे रोवणाऱ्या इंग्रजांनी अन्याय, अत्याचाराचा कहर केला. आदिवासींना इंग्रजांनी पशुपालक जमात, पहाडी -जंगली जमात व गुन्हेगारी जमात असे शब्द वापरल्याची नोंद सरकारी दप्तरात आढळून येते. ( आजही गिरीजन व वनवासी वगैरे प्रकारचे शब्दप्रयोग केले जाते. ) ' आदिवासी ' हा शब्द धरतीमातेशी संबंध दाखवतो. बदलत्या प्रशासनामुळे आणि जामीनदार, ठेकेदारांनी जमिनी हडप केल्यामुळे मालक असलेला आदिवासी आपल्या जमिनीवर नोकर झाला. गुलाम झाला. जाचक कायद्याच्या अन्यायाने उद्रेक निर्माण होण्याचं वातावरण तयार झालं. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पेटत्या विद्रोहाने छोटा नागपूर व्यापले होते.

          याच परिस्थितीत आदिवासींच्या नवक्रांतीचा जनक ' बिरसा मुंडा ' यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्ह्यातील उल्लीहातू या गावात झाला. आई करमी व वडील सुगाना मुंडा हे बांबू व गवतापासून बनविलेल्या झोपडीत राहत. अतिशय गरीबीत आपला उदरनिर्वाह करीत असत. बहीण कोमता व भाऊ कोनू असा छोटा परिवार. सुगाना मुंडा बिरसाकडे मोठ्या आशेनं पहात होते. ते मनोमन विचार करायचे , " आदिवासींचा मुक्तीदाता कधी जन्म घेईल ? "

          बिरसावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मावशीकडे त्याला शिक्षणासाठी खटगाव येथे पाठविले. ते केवळ आपल्या दारिद्रयामुळे. तिथे बिरसा शेळ्या चारायला जंगलात जायचे. निसर्ग वातावरणात इतके तल्लीम व्हायचे की, शेळ्या शेतात जाऊन पिकांची नासधूस करायच्या. मावशीने कंटाळून त्यास परत  आई - वडिलांकडे पाठविले. त्यानंतर वडिलांनी त्यांच्या सासरवाडीला 'साल्गा ' गावी बिरसाला शिक्षणासाठी पाठविले. जयपाल नावाच्या गुरुजींनी त्यांना प्राथमिक शिक्षण दिले. जयपाल यांची शाळा सरकारी नसल्याने बिरसाला ' बुर्ज ' येथील जर्मन मिशन शाळेत प्रवेश दिला. तेव्हा ते ईसाई धर्माच्या सानिध्यात आले. गरीबीमुळे त्यांच्या वडिलांना 'ईसाई ' व्हावे लागले. त्यानंतर बिरसाचे नाव दाऊद व वाडिलांचे नाव मसिहदास ठेवले.

          बिरसाच्या चौकस बुद्धीमुळे तिथे त्यांना मिळणारी हिणकस वागणूक त्याच्या लक्षात आली. ईसाई बनलेल्या अनेक मुंडांच्या कुचंबना त्यांना कळाल्या. प्रस्थापिताप्रमाणेच ईसाई मिशणऱ्या देखील आदिवासींचं शोषण करतात छळतात हे त्यांना समजलं तेव्हा ईसाई धर्माला त्यांनी नाकारलं . परत ते मुंडा झाले. ख्रिश्चन मिशण-यांच्या आगमनानंतर आदिवासी समाज अधिक समस्याग्रस्त झाला. गरीबीमुळे आमिषाला बळी पडून अनेक आदिवासी ईसाई झाले. परंतु शोषणातून त्यांची मुक्ती काही झाली नाही. १८८५ मध्ये आपल्या अस्तित्व व अस्मितेसाठी आदिवासींनी ' सरदारी आंदोलन ' उभे केले. या चळवळीचा बिरसावर प्रचंड प्रभाव पडला.

          उंच कमावलेली शरीरयष्टी, निर्भयी व आत्मसंयमी प्रतिमा  बिरसांचं व्यक्तीमत्व खुलवत असे. पायात खडाऊ चप्पल व डोक्यावरची हंसमुखी पगडी. शूर व धाडसी बिरसा जेव्हा आदिवासी समाजाकडे एक नजर फिरवीत तेव्हा त्यांना हजारो वर्षापासून समाजावर होत असलेल्या शोषणांची चित्रफितच त्यांच्या नजरेसमोर येत असे.

          बिरसाने बंदगावचे जमीनदार जगमोहन पांडे यांच्याकडून रामायण, महाभारताच्या कथा ऐकल्या. वेद, पुराण व अन्य धर्मग्रंथ अभ्यासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, धार्मिक ग्रंथात आदिवासींसोबत छल कपट करण्यात आले. पोटासाठी आई - वडील वनवन भटकायचे. बिरसाने एकदा कबर खोदून मृत शरीरावरील दागदागिणे विकूण घरी दाळ, तांदूळ आणले. दाळभात खाणार एवढ्यात गावकऱ्यांचा लोंढा घरावर चालून आला. मुर्द्याचे दागिणे काढले म्हणून क्रोधाने सगळे ओरडले. त्याच्या अंगावर ताट फेकून आईने तोंड काळे कर म्हणून सांगताच क्षुब्ध होऊन बिरसा जंगलात निघून गेला. सर्व लोक त्याला वेडा बिरसा म्हणू लागले.

          काही दिवसानंतर जंगलातून गावात परतल्यानंतर त्यांनी सर्व मुंडांना आवर्जुन सांगितले, ' मला एक स्वप्न पडले. या स्वप्नात समाज बदलविण्याची महानशक्ती आहे. बिरसाने सर्व मुंडा व उराव आदिवासींना बजावले, आपण एकत्र आलो तर महाराणी / व्हिक्टोरियाचे राज्य समाप्त होईल. बिरसा स्वतः जडीबुटी देऊन अनेक आदिवासींचे रोग बरे करू लागला. त्याच्या जवळ दैवी शक्ती आहे असा समज झाला. त्याने समाज एकत्र केला. ' एक सन्याशी मुंडा आदिवासीत विद्रोह पेरत आहे ' म्हणून त्याला अटक केली. नोव्हें.१८९७ मध्ये जेलमधून सुटल्यानंतर पुन : आंदोलन उभे केले. व्यवस्थेला नकार देउन प्रस्थापिताविरुध्द लढा उभारला. रांचीचे मंदीर मुंडांचे आहे हा त्याचा दावा होता. मंदीरात घुसून आदिवासी नृत्य करीत मूर्तीला तोडले. ईश्वराचे अस्तित्व नाकारल्याने आदिवासींनी मुंडावर प्रेमाचा वर्षाव केला. जगन्नाथपूरच्या मंदीरात म्हशीचा बळी देण्याच्या प्रथेविरुध्द त्यांनी आंदोलन उभे केले. आजही बिरसाची वीरगाथा आदिवासी लोकगीत विशिष्ट रागात गातात.

          " पुटीया मंदीर या बिरसाय कुडकू के दाया बिरसा ,

          सीताराम मुरुतु बिरसाय तिडिसाकेदा,

          डोयसा खूर खरा रे बिरसाय दुरूंगा

          नगापूरे बिरसाय खुटकरी झंडा

          नवरन रे बिरसा हरियार झेंडा I "

( अर्थ : बिरसाने मंदीराला लाथेनं पाडलं. सीताराम मुर्तीला तुडवलं. डोयसा आणि सुरकसामधे नृत्य केलं. डुरूंडाच्या मैदानात गीत गायलं. नागपूरात तुने पांढरा झेंडा रोवला. नवरतनात  तुने हिरवा झेंडा रोवला. - कुर्सिनामा )

            जमीनदार, भूमीहार, महंतो, सामंत, व्यापारी, महाजन यांचेसह इंग्रजांनी ज्यांना छळलं  त्या आदिवासींनी बिरसाच्या नेतृत्वाखाली ' उलगुलान ' छेडलं. बिरसाला कपटाने पकडून विष दिले. ९ जून १९०० ला महान बिरसा शहीद झाला. आदिवासी बिरसाने ' बुध्द ' कधी वाचला किंवा नाही माहित नाही. पण बुद्धाच्या ' शिकवणूकीचे सार त्याच्या तत्वज्ञानात होते. त्यांनी जोतीराव फुले वाचला नाही पण फुलेंचे क्रांतीकारी विचार त्यांच्यात होते. तर कबीरांचे वैज्ञानिक विचार होते. आजही दबलेल्यांना प्रेरणा देणारा, आदिवासींना गुलामीतून मुक्त करणारा महान नायक ' बिरसा मुंडा ' युवकांचा क्रांतीस्त्रोत आहे.

            -उत्तम कानिंदे,

            किनवट ( जि. नांदेड )

            ९४२१७५८०७८

            ८०५५३०१८००

            ukaninde@gmail.com

          

           



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News