....लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज.. -बाबुराव पाईकराव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 26, 2022

....लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज.. -बाबुराव पाईकराव



ता. 25 जून : आरक्षण व वसतिगृह चळवळीचे जनक द पिलर ऑफ डेमोक्रशी राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बाबूराव पाईकराव यांचा लेख येथे देत आहोत. - संपादक


        महाराष्ट्राला प्रबोधनाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. तितकाच महापुरुषांच्या विचारांचा आणि त्यांच्या अखंड कार्याचा दैदिप्यमान वारसा लाभला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. 

       शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कागल या ठिकाणी झाला. त्यानंतर 17 मार्च 1884 रोजी महाराजांना दत्तक विधान होऊन ते कोल्हापूरच्या राजगादीचे वारसदार झाले. त्यांनी जवळजवळ 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांची महती सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगता येईल की शाहू राजे राज्य सिंहासनावर बसून राज्य करणार्‍यांपैकी नव्हते. तर समाजात जाऊन सामाजिक समस्या सोडवून त्या समस्यांचे निवारण करीत. एवढेच नाही तर माणसाच्या  कल्याणासाठी झटणारे माणसाला माणसाचे हक्क मिळवून देणारे ते राजे होते. कारण ते आपला आदर्श शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानत असत. शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते लहान थोरांचे राज्य होते . हीच विचारधारा त्यांनी जपली होती. तसेच त्यांच्यावर स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा पगडा होता .

      शाहू महाराज हे दृष्टे राज्यकर्ते  होते. ते वैचारीक,अभ्यासू विद्वान,दानशूर समतावादी विचाराचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानात विकास कामांना गती दिली होती. त्यांनी लोककल्याणकारी निर्णय घेतले होते.शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते. स्त्री सन्मानी राजे होते . त्या काळची परिस्थिती ओळखून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा उंचावतात. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो .व्यवसाय करण्याची पात्रता अंगी येते. स्वाभिमान जागृत होतो. सामाजिक गतिशीलता निर्माण होते. ते म्हणतात, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असा इतिहास सांगतो. अज्ञानात घडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सदी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत .म्हणून त्यांनी 1912 साली प्राथमिक शिक्षण हे शक्तीचे करून मोफत केले. एवढेच नाही तर लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी राहता यावे यासाठी वस्तीगृहाची सोय केली . यामध्ये त्यांनी सर्वच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांची म्हणून वस्तीगृह बांधले.त्याची सुरुवात 1920 मध्ये उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतिगृहाची पायाभरणी केली. आणि म्हणून कोल्हापूरला 'वसतिगृहाची मातृभूमी' हा  गौरव प्राप्त झाला. तसेच त्यांनी शेती विकासाचे चांगले निर्णय घेतले. सहकारी संस्था स्थापन केल्या. बाजारपेठा स्थापन केल्या. शेती विकासाला चालना मिळा्वी यासाठी शेतीच्या आधुनिकीकरणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. राधानगरी धरणाची उभारणी केली. शाहू महाराज म्हणतात, कृषक हाच राष्ट्राचा खरा हक्कदार आहे. त्याच्या विकासातच राष्ट्राचा विकास आहे. 

      महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी सुद्धा पुढाकार घेतला. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी 1919 मध्ये कायदा केला. बालविवाह बंदी आणली. पुनर्विवाहाचा कायदा केला. आणि विधवा विवाहास कायदेशीर मान्यता दिली. समाजामध्ये बंधुत्वाची मुहूर्तमेढ रोवताना त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. एवढेच नाही अमानवी प्रथा बंद केल्या. गुन्हेगार जमात संबोधलेल्या जातीची हजेरी बंद केली. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याचा व त्यांना समानतेने वागविण्याचा कायदा केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारद्वारे मे 1900 मध्ये त्यांना 'महाराजा' ही पदवी बहाल करण्यात आली. तर उत्तर प्रदेश मध्ये कानपूर येथून कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना 'राजर्षी' ही पदवी बहाल केली. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये बहुमोल कार्य केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून बहुजन समाजाच्या उद्धाराचा आवाज उठवणारे एक क्रांतिकारक समाज सुधारक होते.

     त्यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबासाहेबांचा स्नेही दत्तोबा पवार यांच्यामार्फत संपर्क आला. आणि लगेच महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याशी आणि विद्वतेची त्यांना पारख झाली. ते बाबासाहेबांना मित्र मानीत असत. त्यांनी बाबासाहेबांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांना मुकनायक हे साप्ताहिक काढण्यासाठी मदत केली. बाबासाहेबांचा त्यांनी भव्य सत्कार घडवून आणला. 1920 मध्ये माणगाव याठिकाणी परिषदेस शाहू महाराज उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला. ह्याबद्दल मी तुमचे अंतकरणाने अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर ते पूर्ण देशाचे पुढारी होतील. अशी माझी मनोदेवता सांगते. आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. 

    अर्वाचीन युगामध्ये भगवान गौतम बुद्ध ,सम्राट अशोक या द्वियींनी समाजामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा जसा यशस्वी प्रयत्न केला तसा एकोणिसाव्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराजांनी केला. छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल न.च. केळकर हे म्हणतात, धर्मशास्त्र, राजकारण शास्त्र, समाजशास्त्र या तिन्हीमध्ये वक्रबुद्धीचा नांगर खोल घालून सत्तेच्या बळावर शाहू महाराजा इतकी या काळात दुसर्‍या कोणीही विचारी जमीन उलटी पालथी केली नसेल, त्यांनी केलेल्या मेहनत मशागतीची कोणत्या प्रकारचे पीक आले हे लोकांना दिसतच आहे. तथापि बाजूस पडलेल्या अनेक वर्गांना अपूर्व पुढारी मिळून त्यांची बुद्धी जागृती झाली. तेच तितकेच खरे महाराजांची उद्योगशीलता प्रयत्नांची चिकाटी व ध्येयाची एकनिष्ठता लोकोतर होती. हेही खरे आहे .

       प्रसिद्ध चरीत्रकार धनंजय कीर म्हणतात, भारताच्या इतिहासात प्राप्त झालेल्या आढळ स्थानाविषयी लिहिताना म्हटले आहे ,शाहू हा खरोखर एक अनन्यसाधारण आत्मशक्तीचा पुरुष होता. त्यांचे मोठेपण हे साधेपणाने आणि शोभले. ते जनक राजा सारखी राजर्षी होते. कारण ते सामान्य जनतेचे तत्त्वज्ञ होते .महात्मा फुले यांच्यानंतर त्यांनी लक्षावधी दीनदलितांच्या हृदयात आशेचा दिवा पेटविला. ह्या एका कार्यामुळेच त्यांना भारताच्या इतिहासात उच्च स्थान प्राप्त झाले आहे. भारतातील सामाजिक व आर्थिक लोकशाही जशीजशी यशस्वी सामर्थ्यशाली होत जाईल तसतशी शाहूंची ऐतिहासिक मूर्ती अधिकाधिक तेजस्वी दिसत दिसत जाईल . जनता आपल्या अपार प्रेमाने मी अखंड कृतज्ञतेने त्यांचे स्मरण करीत राहील. यात संदेह नाही. अर्थातच छत्रपती शाहू महाराजांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले जाईल....

    अशा या महान लोकराजाला  कोटी कोटी प्रणाम...।.


 -बाबुराव पाईकराव ,

डोंगरकडा जि. हिंगोली 

.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News