गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक ; इतर शाळांनीही प्रेरणा घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 14, 2023

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक ; इतर शाळांनीही प्रेरणा घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

 



 

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नावीन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक आणि शाळांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.


            मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गुरूवारी 'गुणी शिक्षक, गुणवंत शाळा' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            शाळा म्हणजे बालकांच्या सर्वागीण विकासाचे ठिकाण असते, शाळेच्या वर्गात देशाचे भविष्य घडते. ग्रामीण, दुर्गम विद्यार्थी घडविण्याचे गुरूजनांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. शिक्षकांचा खडतर वाटेवरील हा आशादायक प्रवास सर्वांसमोर यावा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.


            राज्यातील ६५,६३९ शासकीय शाळांमधील हजारो शिक्षक उत्तम शैक्षणिक कामगिरी करीत आहेत. मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई उपनगरातील एक मनपा शाळा आणि उर्वरित ३४ जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे एकूण ३५ लेख या पुस्तकात संकलित केले आहेत.


शाळेतूनच आपले मूल गुणवंत होऊन बाहेर पडेल, या विश्वासाने पालक आपले मूल शिक्षकांच्या हाती सोपवतात. पालकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकही सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची ही धडपड म्हणजेच गुणवत्तेकडे वाटचाल करणारा त्यांचा खडतर प्रवास आहे. हा प्रवास शिक्षकांनी आपल्याच शब्दात या लेखांमध्ये मांडला आहे.


*मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचाही सहभाग- कैलास पगारे*


            प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या या उपक्रमांप्रमाणेच असे असंख्य नावीन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाळांमध्ये सुरू आहेत. यामुळे शासकीय शाळांना चांगला लोकसहभागही मिळत आहे. गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण यातून अपेक्षित आहे. 'निपुण महाराष्ट्र' उपक्रमातूनही असंख्य माता गट स्थापन करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग आम्ही वाढवीत आहोत, असे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. शाळेत गुणवत्तेचा मळा फुलविण्यासाठी हे लेख सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त व प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News