जागतिक पत्र लेखन दिनानिमित्त मारतळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आवडत्या व्यक्तींना पत्रे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 1, 2026

जागतिक पत्र लेखन दिनानिमित्त मारतळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आवडत्या व्यक्तींना पत्रे

 



मारतळा (ता. १ सप्टेंबर २०२६) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा ही शाळा सातत्याने विविध नाविन्यपूर्ण व आनंददायी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पत्र लेखन दिनानिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या नेते, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रे लिहून अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.


     उपक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पत्र लेखन दिनाची पार्श्वभूमी सांगितली. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध लेखक रिचर्ड यांनी सन २०१४ मध्ये या दिनाची सुरुवात केली असल्याचे सांगत, आजच्या व्हॉट्सॲप, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या युगातही हस्तलिखित पत्रांचे महत्त्व, भावनिक मूल्य आणि संवादाचे वेगळेपण विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.


      यानंतर शाळेच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तींना पत्र लिहावे, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण, लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे चिखलीकर तसेच शाळेतील शिक्षक यांना पत्रे लिहिली.


     या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तींना शुभेच्छा देतानाच शिक्षण, समाज, पर्यावरण, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि भविष्यातील अपेक्षा याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.


     या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला, सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि लेखन कौशल्याला चालना मिळण्यास मदत होणार आहे. स्वतःच्या भावना आणि विचार पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आनंददायी व संस्मरणीय ठरला.


उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही पत्रे लवकरच पोस्टाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींपर्यंत पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी सांगितले.


     यावेळी शाळेतील शिक्षक प्रल्हाद पवार, पांडुरंग पाटील, सुषमा चिलकर, रेवती दमकोंडवार, माया शिंदे यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News