जागतिक महिला दिनानिमित्य
#स्त्री_स्वातंत्र्याचा_जाहीरनामा
-डॉ. मंजुश्री खोब्रागडे
आमची वाड्याची संस्कृती
आणि त्यांची वाड्याची संस्कृती भिन्न आहे
त्यांच्या वाड्यात...
डफाच्या आवाजावर घुंगराने ताल धरला
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगीत केल्या
कित्येक श्वास श्वासात गुदमरले
तरल स्त्रीसुलभ भावना रांड झाल्यात
त्याच्या पुरुषार्थाने कित्येक वड भ्रष्ट झालेत
सावित्री धावा करेल म्हणून...
पण माझी सावित्री त्या सावित्रीहून भिन्न आहे
तिने केला निश्चय शिक्षणाचा
पाटीवर अक्षरांचा ताल धरला
गुदमरलेले श्वास शिक्षणाने मुक्त केलेत
मोडलेत वाडे ... 'भिडेवाडा' आणि 'फुलेवाड्यातून'
समतेची गंगोत्री वाहण्यासाठी...
वाड्याच्या संस्कृतीचा तो आजही मिशीवर मारतोय ताव
पुरुषार्थ गाजवण्यासाठी...
त्याचा नपुंसक पुरुषार्थ
आजही शोधतो...
वीर्यस्खलन करण्याची जागा
स्त्री झिजवते पायऱ्या ...
डोळ्यावर पट्टी बांधून निवाडा करणाऱ्या व्यवस्थेच्या
असमतोल तराजू हाती असलेल्या व्यवस्थे कडून
न्याय मिळावा म्हणून...
अगं एखादं हत्यार ठेव ना सोबतीला ...सावित्रीसारखं...
स्वतःच स्वतःला न्याय देण्यासाठी
आपलीही बिल्कीस बानो होऊ नये म्हणून...
-डॉ. मंजुश्री खोब्रागडे
बुलढाणा
08/03/2023
No comments:
Post a Comment