नांदेड (जिमाका) दि. 18 : आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात आजच्यापेक्षा अधिक आव्हाने होती. आश्रम शाळेतून शिक्षण घेत नोकरीचे आमचेही स्वप्न होते. जिद्द, चिकाटी, मेहनत हे जर सोबतीला असतील तर वाटेल त्या आव्हानावर मात करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असून आत्मविश्वासाने कौशल्य शिक्षणाकडे वळा, असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने किनवट येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील आदिवासी, बहुजन समाजातील युवकांना विविध अशासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. मृणाल जाधव,कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री यांचे शासकीय स्वीय सहायक वसंतराव पालवे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेशकुमार गणवीर, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थे किनवटचे प्राचार्य सुभाष परघणे व माहूरचे प्राचार्य फारुकी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या मेळाव्यास एकुण 19 खाजगी आस्थापनांनी सहभाग घेऊन विविध पदांसाठी सुमारे 1 हजार युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. 2 हजार रिक्त पदांची याठिकाणी नोंदणी करण्यात आली होती. अनेक युवकांनी आपल्या यशस्वी मुलाखती दिल्या व यश संपादन केले. नौकरीसमवेत स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी आज गावोगावी उपलब्ध आहेत. यासाठी कौशल्य शिक्षणाची अत्यावश्यकता आहे. शासन यादृष्टिने प्रयत्न करीत असून ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांपासून ते युवकांच्या मनात उद्योगाच्या जर संकल्पना असतील तर त्या साकार करण्यासाठी जिल्हा प्रशासन व कौशल्य विभाग तत्पर आहे. विद्यापीठ पातळीवर यादृष्टिने चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर कार्यान्वित आहे. महिला, युवक-युवतींनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी प्रास्ताविकातून केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक तथा ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर यांनी बायोडाटा व मुलाखत तंत्र याविषयी सविस्तर माहिती दिली.
आज झालेल्या या महामेळाव्यात 591 उपस्थितांनी प्रत्यक्ष नोंदणी केली तर 458 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. यावेळी मुलाखत दिलेल्या युवक- युवतींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , पंचायत समितीचे माजी उप सभापती कपिल करेवाड, भाजपानेते धरमसिंग राठोड , भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे , भाजपा किनवट तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे , माहूर तालुकाध्यक्ष ऍड . दिनेश यवतकर , शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार , माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार , युवामोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत क-हाळे, गोपु महामुने , बालाजी आलेवार, अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम पाटील, युवामोचा तालुका उपाध्यक्ष शेख लतिफ , सुरेश साकपेल्लीवार , शहर सरचिटणीस विश्वास कोल्हारीकर, शहर सचिव जय वर्मा, शहर उपाध्यक्ष राहुल दारगुलवार , आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्ह आदींनी मेळाव्यास हजेरी लावली होती.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रोजगार समन्वयक रज्जाक सय्यद यांचेसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी-कर्मचारी आदींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment