" विकसीत भारत @ 2047 च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी "आदी कर्मयोगी अभियान-प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम " राबविण्यात येत आहे. यानुषंगाने "आदिवासी गाव व्हिजन 2030 घोषणापत्र " मंजूर करण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी गाव पातळीवर विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 'आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे ' यांचा लेख येथे देत आहोत . " -संपादक
धरती का आबा भगवान शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे हे 150 वे वर्ष आहे. या आदी सेवा पर्वाच्या स्मरणार्थ केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या वतीने "आदी कर्मयोगी अभियान-प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम " हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेवटच्या घटकांपर्यंत सेवा व लोककेंद्रित विकासाची पूर्तता करणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विकसित भारत @ 2047 च्या दिशेने मार्ग मोकळा होईल ! या दृष्टीने शेवटच्या टप्प्यातील अभिसरण व प्रभावी सेवा समर्पणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील 20 लाख युवा आदिवासी नेत्यांना प्रशिक्षीत व एकत्रित करून त्यांच्या भरीव सहभागातून 2 ऑक्टोबर 2025 रोजी देशातील 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 550 जिल्ह्यातील तीन हजार तालुक्यांमधील एक लाख आदिवासी गावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून "आदिवासी गाव व्हिजन 2030 घोषणापत्र " मंजूर करण्यात येणार आहे. ही जगातील सर्वात मोठी तळागाळातील आदिवासी नेतृत्व चळवळ आहे.
यानुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 169 आदिवासी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची संकपना आपण जाणून घेऊ या. शासनाचा हा अभिनव उपक्रम आहे.' कर्मयोग ' या संकल्पनेवर हे आधारित आहे. यामध्ये विविध विभागाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका , जबाबदारी व आत्ममूल्यांकन हे महत्वाचे आहे. आदी कर्मयोगी अभियानाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे : आदिवासी पाड्यातील लोकांना सक्षम बनविणे तसेच स्थानिक नेतृत्वाला संधी देणे , आदी कर्मयोगी अभियान हे सेवा , संकल्प व समर्पण या मुल तंत्रावर आधारलेले आहे , हा जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्व कार्यक्रम आहे , विकसित भारत 2047 या दृष्टिकोनासाठी हे अभियान 12 आदिवासी गावांमध्ये राबविण्यात येत आहे.
नाशिक व नागपूर येथे स्टेट प्रोसेस लॅब हे चार दिवशीय सुलभक प्रशिक्षण झाले यामध्ये प्रत्येक जिल्हयातून 8 डिस्ट्रीक्ट मास्टर ट्रेनर (डीएमटी) सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यातून सहायक प्रकल्प अधिकारी विकास / योजन) प्रदीप नाईक , वन परिक्षेत्राधिकारी सचिन धनगे , अधिक्षक संदीप कदम , उप अभियंता एस .पी. गोविंदवाड , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी. गायकवाड , बाल विकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखेडे , विस्तार अधिकारी (पं) वसंत वाघमारे व केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे ह्या डीएमटींनी डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनच्या सभागृहात 3 सप्टेंबर रोजी ओरिएंटेशन सेशन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले , दृकश्राव्य माधमाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व विविध विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांनी या अभियानाची माहिती दिली.
त्यानंतर ह्या डीएमटीच्या मार्गदर्शनाखाली 9 ते 11 सप्टेबर या कालावधीत जिल्हास्तरावर डिस्ट्रीक्ट प्रोसेस लॅब हे तीन दिवशीय जिल्हास्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यात प्रत्येक तालुक्यातून आरोग्य , ग्रामविकास , कृषी , आदिवासी विकास , महिला व बाल विकास , वन , शिक्षण व पाणीपुरवठा या विभागाचे प्रत्येकी एक या प्रमाणे आठ प्रशिक्षणार्थी यांचे तालुका सुलभक प्रशिक्षण (बीएमटी ) झाले. ह्या बीएमटीच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक प्रोसेस लॅब हे तालुका स्तरीय प्रशिक्षण झाले यात गाव स्तरावरील प्रत्येक विभागाचा अधिकारी कर्मचारी यांना दोन दिवसाचे प्रशिक्षण झाले. यानंतर गावस्तरावर आदी सेवा केंद्र -एक खिडकी आदिवासी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले.
या अभियानाचेमुख्य तीन स्पार्क्स आहेत. यामध्ये एक आहे आदी कर्मयोगी , दुसरा आहे आदी सहयोगी आणि तिसरा आहे आदी साथी स्वयंसेवक . आदी कर्मयोगी यामध्ये शासकीय अधिकारी , राज्य , जिल्हा , तालुका आणि पंचायत स्तरावर प्रशासनाचे प्रमुख चालक ते योजनांचे एकत्रीकरण , संस्थात्मक ,समर्थन आणि प्रतिसादात्मक वितरण सुनिश्चित करतात. आदी सहयोगी यामध्ये युवा कार्यकर्ता , शिक्षक , डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ता , शिक्षण ,आरोग्य , जागरूकता आणि नवोपक्रम यांच्यातील प्रवेशाला जोडणारे प्रेरित सेवा प्रदाते आणि सुशिक्षित आदिवासी तरुण यांचा समावेश आहे. आदी साथी स्वयंसेवक यामध्ये स्वयंसेवक गट सदस्य (एनआरएलएम) , ग्रामस्थ , आदिवासी वडिलधारी , तळागाळातील परिवर्तन घडवणारे आणि समुदायाची सूत्रधार जे लोकांना एकत्रित करतात , परंपरा जपतात आणि स्थानिक ज्ञानाचे समर्थन करतात . या अभियानाचे तीन स्तर आहेत : - आय (मी) वैयक्तिक कार्यशैलीतील बदल , वुई (आपण) : विभाग / टीम स्तरावरील सकारात्मक बदल आणि अस ( आपण सर्व मिळून ) : जिल्हा राज्य / राष्ट्रासाठी योगदान .
आदी कर्मयोगी अभियान प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रम हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. यामधून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान , पीएम जनमन योजना , राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम ,एकलव्य निवासी शाळांचा विस्तार ,शिष्यवृत्ती योजना , आदिवासी बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनांवर आधारित लोकसहभागातून उत्कृष्ट गावनिहाय आराखडा तयार करणे हे साध्य करायचे आहे. चला तर मग आपण एकत्र येऊया. दुःख , दैन्य , दारिद्र्य , अज्ञान , अंधःकार यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या पाड्या-गुड्यातील आदिवासींच्या जीवनात नव चैतन्य आणण्यासाठी स्वतः झोकून देऊन कार्य करू या .
-उत्तम कानिंदे ,
आदी कर्मयोगी (डीएमटी) ,
किनवट (नांदेड)
संवाद : 9421758078
ईमेल - ukaninde@gmail.com







No comments:
Post a Comment