दत्तात्रय वारे गुरुजींच्या अश्रूंचा अर्थ....(हेरंब कुलकर्णी ) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, October 1, 2025

दत्तात्रय वारे गुरुजींच्या अश्रूंचा अर्थ....(हेरंब कुलकर्णी )





दत्तात्रय वारे गुरुजींच्या अश्रूंचा अर्थ....(हेरंब कुलकर्णी )


वारे गुरुजी!
व्वा रे गुरुजी!!!

T4 एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील शाळांसाठी आयोजित केलेल्या जगातील सर्वोत्तम शाळा स्पर्धेमध्ये दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या पुणे जिल्ह्यातील जालिंदर नगर या शाळेने जगभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शाळेला एक कोटी रुपये बक्षीसाची रक्कम अबुधाबी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात वितरित केली जाणार आहे. अनेक संकटामधून तावून सुलाखून निघत स्वतःला सिद्ध करणाऱ्या या शिक्षकाच्या संघर्षशील प्रवासाविषयी हेरंब कुलकर्णी यांचा लेख येथे देत आहोत . - संपादक


     काल रात्री साडेदहा वाजता दत्तात्रय वारे गुरुजींचा फोन आला. फोन वरती गुरुजीआनंदाने बोलत होते.. बोलताना हसत होते. आणि रडतही होते ते अश्रू आनंदाचे होते .जागतिक स्पर्धेमध्ये जालिंदर नगरची शाळा अव्वल दर्जाची ठरल्याचा निकाल काल रात्री जाहीर झाला.एक कोटी रुपयांचे बक्षीस या शाळेला मिळते आहे ...आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या शाळांच्या आस्थापनांच्या स्पर्धेमध्ये आमची जिल्हा परिषदेची शाळा तिची गुणवत्ता सिद्ध करते आहे हा सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अभिमानाचा आणि आत्मविश्वास देणारा क्षण आहे.... निकाल जाहीर होताच इतक्या आनंदाच्या क्षणी त्याला माझी आठवण व्हावी याने मी सुद्धा हलून गेलो... त्याच्या मनातील या कृतज्ञतेच्या भावनेने सद्गतीत झालो..

 दत्तात्रय वारे आता रणजीत दिसले यांच्यानंतर ग्लोबल गुरुजी झाले आहेत... या दोघांनी महाराष्ट्राचे नाव शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. दत्तात्रय वारे यांच्यातील समर्पण प्रांजळपणा प्रामाणिकपणा जिद्द आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे वृत्ती बघून मला तर अनेकदा त्यांच्यात साने गुरुजींचा भास होतो. हा माणूस इतका संवेदनशील आहे की प्रशासनाने त्याच्यावर खोटे आरोप केल्यानंतर आरोपातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत पायात चप्पल घालायची नाही असा निर्धार करून गावोगावी हा माणूस चप्पल न घालता फिरतो आहे पण त्यांच्याकडे फक्त इतकेच नाही तर उच्च दर्जाची अध्यापन शैली आहे... विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानापासून सर्व काही ते देऊ शकतात. रोबोटिक्स पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन प्रवाह त्यांना समजतात आणि शिष्यवृत्ती पासून नवोदय पर्यंत आजच्या बाजारात चालणारे गुणवत्तेचे निकषाlही ते पूर्ण करतात..

 या आनंदाच्या क्षणी खरे तर फक्त आनंदच साजरा करायला हवा पण मला दत्तात्रय च्या कालच्या फोनवरील अश्रूंनी खूप अस्वस्थ केले.. बोलता बोलता ते रडत होते. त्यांची ती अश्रूंची भाषा फक्त मला आणि त्यांनाच कळत होती कारण त्यांच्या त्या वाईट दिवसांचा मी साक्षीदार आहे... एका माजी आमदाराच्या आणि काही  विकृत व्यक्तींच्या कारस्थानातून दत्तात्रय वारे आणि वाबळेवाडी गावकरी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यातून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले. राष्ट्रपती पुरस्कार विजेता हा शिक्षक निलंबित झाल्यावर समाजामनावर साधा ओरखडाही उठला नाही... जवळपास एक महिन्याने मला हे समजल्यावर मी त्यांच्याशी बोललो. त्यांची बाजू समजावून घेतली आणि सोशल मीडियात मोठी पोस्ट लिहिली ..अनेक संवेदनशील नागरिकांनी ती शेअर केली.. त्यानंतर हा विषय पुढे आला. आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी राहिलो. पुणे जिल्हा परिषदेच्या तेव्हाच्या सीईओ यांना शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेलो. त्यात syscom संस्थेचे राजेंद्र धारणकर, वैशाली बाफना,  आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत आणि इतर मित्र होते. पुण्यातील  प्राची कुलकर्णी आणि इतर पत्रकार मित्र होते.  आम्ही एसएमएस चे अनोखे आंदोलन चालवले होते. सीइओ यांना भेटताच ते म्हणाले तुमचे दीड हजार मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पडले आहेत... वाबळेवाडी गावात गेलो गावकऱ्यांची बाजू समजावून घेतली आणि नंतर वारे गुरुजींना किमान पुढच्या शाळेवर नेमणूक मिळाली

 पण संकोच बाजूला ठेवून हे आज सांगितले पाहिजे की आता वारे गुरुजींच्या कौतुकाच्या पोस्ट वाहतील... जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अस्मितेचा ते विषय होतील पण त्या वाईट दिवसात वारे गुरुजींच्या बाजूने  एक दोन संघटना वगळता इतर शिक्षक संघटना बोलल्या नाही.. शिक्षणात काम करणारे शिक्षक, कार्यकर्ते आणि संस्था ही बोलल्या नाहीत. शिक्षक आमदारही बोलले नाहीत आणि जे बोलले त्यांनी एकदा प्रतिक्रिया देऊन विषय सोडून दिला,पाठपुरावा केला नाही.. त्या दिवसात वारे गुरुजींचे एकटेपण उदास पण मी जवळून बघितला आहे..मला वाईट याचे  वाटते की अशी चांगली माणसे एकटी पडताना समाज म्हणून आपण कुठे असतो..?  खैरनार असेच निलंबित झाले होते आज सोनम वांगचुक तुरुंगात आहेत. अरुण भाटिया अनेक अधिकाऱ्यांच्या याच कहाण्या आहेत.. गिरीश फोंडे नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील एक शिक्षक केवळ शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहिला म्हणून गेले ५ महिन्यापासून निलंबित आहे...त्या जिल्ह्यात आवाज उठला पण शिक्षक समुदायात आज सन्नाटा आहे...हरियाणातील खेमका पासून तुकाराम मुंडे पर्यंत प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या दर महिन्याला बदल्यांच्या बातम्या आपण वाचतो. समाज म्हणून आपण या माणसांच्या पाठीशी उभे राहत नाही.. एक पोस्ट सुद्धा लिहिल्या जात नाहीत..सोनम वांगचुकच्या वेळी थ्री इडियटला डोक्यावर घेणारा मध्यमवर्ग आज  कुठे आहे..? तो  त्यांना आता देशद्रोही ठरवण्यात पुढे आहे..

 तेव्हा वारे गुरुजीसारखी अशी अनेक माणसे  या व्यवस्थेत एकटी असतात... आजूबाजूचे लोक त्यांचा दुस्वास करतात. इर्षा करतात आणि  पुन्हा समाज त्यांचे दोष काढतो...एक काळ असा होता की वारे गुरुजींनी भ्रष्टाचार केला हे सांगणारे लोक मला भेटत होते... एक पत्रकार मित्र काळजीने मला म्हणाला होता की तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावून बसाल कृपया या विषयातून बाजूला व्हा 

पण आज वारे गुरुजी हे  सोने आहे हे महाराष्ट्राने नाही तर जगाने सिद्ध केले आहे.. त्यांना वाकोल्या दाखवणारे तेव्हाचे राजकारणी, अधिकारी हे सारे केविलवाणे झाले आहेत. पुणे जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार  यांनी  वारे गुरुजी यांचा जाहीर सन्मान करून  ज्या आमदाराच्या सांगण्यावरून हे केले त्याच्यावर पक्ष म्हणून कारवाई करावी...मागच्या  चुका दुरुस्त कराव्यात.. आणि वारे गुरुजींच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांपासून सर्व पक्षाचे नेते त्यांचे कौतुक करतील पण गावोगावचे राजकारणी प्रामाणिक शिक्षकांना जो त्रास देतात तो त्रास थांबवण्याची हमी राज्यातील राजकीय पक्षांचे नेते घेतील का ..?
आज त्याच पुणे जिल्ह्यात युवराज घोगरे नावाचा शिक्षक पुन्हा चौकशीला सामोरे जातो आहे .पुन्हा चौकशी लागते त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली तर ती शस्त्रक्रिया खरी की खोटी याच्याबद्दलही अर्ज येतात तेव्हा हा त्रास असे वेगळे शिक्षक ठिकठिकाणी असतात.. ( युवराज घोगरे याची शाळा- https://youtu.be/nD-mRU1tvjo?si=MkParTDzBGrqj9pN )
 असे वारे गुरुजी प्रत्येक शाळेत असतात , शासनाच्या प्रत्येक विभागात असतात .जो कोणी वेगळे करायला जातो त्याला असाच त्रास होतो.. माझ्यासकट अनेक संवेदनशील लोक अधिकारी या प्रकारच्या अनुभवातून गेलेले असतात.. 
मी माझ्या नोकरीत कधीही वर्गात फोन वापरला नाही..अगदी शिक्षणमंत्री अधिकारी यांचेही फोन घेतले नाही..पण तरीही मी वर्गावर जात नाही ,शाळेतच नसतो अशी बदनामी करणारे अनेक विकृत बघितलेत..तेव्हा अशी भाबडी ध्येयवादी माणसे जपली पाहिजेत. ही माणसं निराश होऊ देऊ न देता आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे....आणि अशी माणसे फक्त शिक्षकच नसतात ते सर्व शासनाच्या विभागात असतात सर्व खाजगी कंपन्यांमध्ये असतात , अनेक पत्रकार अशा प्रकारचा संघर्ष करताना एकटे असतात.प्रसंगी जीव गमावतात.. इतकेच काय राजकारणात सुद्धा त्यांच्या त्यांच्या पक्षात संघटित टोळ्यांशी लढताना एकटे आणि एकाकी असतात... अगदी वेगळे काम करायला निघालेला सरपंच सुद्धा त्या गावात एकटा असतो आणि तथाकथित पापभीरू समाज हा फक्त गंमत बघत असतो त्यातून मग असे वेगळे काम करणारे लोक निराश होतात आणि इतरांसारखे होऊन जातात.. मुख्य मुद्दा  वेगळे काम करणाऱ्या लोकांच्या  पाठीशी उभे राहणे हा आहे ...वारे गुरुजींच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा तोच सांगावा आहे....

 जाता जाता आठवण रणजीत डीसले 
 आज  कुठे आहेत..? कोणी चौकशी करते आहे का ? यांची इतकी टोकाची बदनामी केली अमेरिकेतील एक मोठी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर या माणसाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक असण्याचा राजीनामा दिला आणि आज ते जागतिक स्तरावर काही दिवसांनी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील.. जिल्हा परिषद ची नोकरी त्यांना सोडायला आम्ही भाग पाडले. त्यांचा उपयोग करून घेतला नाही इतके आम्ही दळभद्री आहोत..
 चांगल्या माणसांचे दोष काढण्यात आम्हाला काय गंमत वाटते..? दारू पिणारे, प्लॉटचे व्यवहार करणारे , शाळा सोडून राजकारण करत फिरणारे,वर्गात मोबाईल खेळणारे, बिनधास्त फोनवर गप्पा मारणारे ,संघटनेच्या दबावाने शाळेबाहेर फिरणारे शिक्षक हा कधीच चर्चेचा विषय होत नाही पण चांगल्या माणसांच्यावर सूक्ष्मदर्शकाच्या  नजरा लावणारे आजूबाजूचे शिक्षक आणि समाज ही विकृती जास्त अस्वस्थ करते आणि म्हणून काल रात्री वारे गुरुजींच्या  फोनने  ज्या शिक्षकाच्या पाठीशी आपण उभे राहिलो ते सोने होते हे सिद्ध झाल्याचे समाधान नक्कीच होते पण इतक्या आनंदाच्या क्षणी दत्ता वारे रडत होता त्या अश्रूंची भाषा आम्हा दोघांनाच कळत होती..

 त्या आनंद अश्रूंमध्ये हे भोगलेले सारे घाव होते ते घाव कदाचित या जागतिक पुरस्काराने ही भरून निघणार नाही पण समाज म्हणून गावोगावी प्रशासनात राजकारणात समाजकारणात अशा माणसांना जपायला हवे..
दत्ता तुझा अभिमान वाटतो.......

-हेरंब कुलकर्णी

ताजा कलम : प्रिय दत्ता तुला त्रास देणाऱ्यांच्या गालफाडावर आता आंतरराष्ट्रीय  कंपनीच्या चपलेचे वळ उमटल्यामुळे आता चप्पल घालायला  हरकत नाही असे वाटते...!!!
Heramb Kulkarni 
Vilas Bade Page

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News