प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव (पुस्तक परिचय -नासा येवतीकर ) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 13, 2022

प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव (पुस्तक परिचय -नासा येवतीकर )

 



            प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्याचप्रकारची सृष्टी आपल्या नजरेस पडू शकते. प्रेम म्हटले की आपल्या समोर एक प्रियकर आणि एक प्रेयसी हेच चित्र पहिल्यांदा उभे राहते. याशिवाय प्रेमाचे अन्य कोणतेही चित्र लवकर तयार होत नाही. चित्रपटातून देखील याच विषयावरील प्रेम भडक करून दाखविले जाते त्यामुळे तीच भावना जनमाणसांत उठून दिसते, यात शंका नाही. मात्र प्रियकर आणि प्रेयसी यांच्या व्यतिरिक्त जगात अन्य ठिकाणी देखील उत्कट प्रेम दृष्टीस पडते, ती दृष्टी कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांना मिळाली म्हणूनच ते प्रेम उठाव करू शकले. उठाव हा शब्द क्रांतीशी जोडला जातो. उठाव करणे म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, अन्याय सहन न करणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. प्रेमात कसला आला उठाव ? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे साहजिकच आहे. कवीच्या भाषेत सांगायचे म्हणजे ' मानवाची घालमेल, मनाच्या अंतरीचे दुःख, व्यथा, वेदना, यांनी मनात साठवून ठेवलेली खदखद याचे रूपांतर असंतोषात होते. आपल्या विरुद्ध झालेल्या किंवा होऊ पाहणारा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय इ. अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजे उठाव होय.' 

अल्बर्ट एलिस या मनोविकास शास्त्रज्ञाच्या मते, प्रेम भावना ही आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी सर्वसामान्य भावनांसारखी एक आहे. प्रेम उठाव मधील कविता वाचतांना पदोपदी याची जाणीव होत असते. 

संपूर्ण विश्व हे प्रेमावर अवलंबून आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे कोणालाही शक्य नाही. तरुणपणाच्या काळात प्रेम जरा जास्त उफाळून येत असते. म्हणूनच कवी आपल्या खास या चारोळीत म्हणतात, 

*प्रत्येकाच्या आयुष्यात , प्रेम होत असतं*

*प्रत्येकाच्या तारुण्यात, कोणीतरी खास असतं*


प्रेमात पडलेली माणसं सर्व काही विसरून जातात. प्रेमात एवढी ताकत आहे की, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली माणसं सर्वस्व विसरून जातात ही भावना सांगताना कवी नातं यामधून व्यक्त होताना म्हणतो,

*हृदयाचं नातं तुझ्यासोबत जोडले*

*जगाशी नातं मी सारच तोडले*


प्रेमात विफल झालेली माणसं आपली जीवनयात्रा संपवितात, काही वेडेपिसे होतात असा आजवरचा अनुभव आहे म्हणून कवी आपल्या प्रेयसीला म्हणतो, 

*देवू नको प्रेम चकवा*

*टाकू नको डाव फसवा*


*असेन मी, नसेन मी, कवितेने मी* 

*हृदयात तुमच्या वसेन मी*

या अस्वस्थ कवितेतील ओळी वाचताना कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी प्रकर्षाने आठवतात, त्या म्हणतात

*असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे*

*फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे*


मुलांचं आणि आईचं नातं जगावेगळं आहे. त्याचं प्रेम अवर्णनीय असे आहे. संसाराचा गाडा हाकताना आपल्या आईने सोसलेले कष्ट आणि केलेलं काम मूल कधीही विसरू शकत नाही. कवीची आई देखील अनेक हालअपेष्टा सहन करीत संसार केला असल्याचे अनुभव सांगताना आभाळ होताना माय या दीर्घ कवितेत कवी म्हणतो, 

*झाडाझडती ही तुझ्या जिंदगीची, गरिबीला गरीबीची*

*तवा सोबत तुझ्या हाताची, कष्टाची मोलमजुरीची*

*खंबीर लढताना माय, तुला मी पाहिलय माय*


प्रेमाचा झरा आटला की मायेचा ओलावा संपतो. याउलट जोपर्यंत एकमेकांवर अतूट प्रेम असेल तोपर्यंत विश्वास कायम राहतो आणि दोघांमध्ये असलेले नाते देखील अतूट राहते. याविषयी प्रेम या चारोळीत कवी म्हणतो,

*प्रेम संपले की नाते तुटते*

*प्रेम टिकले की नाते जुळते*


कवीच्या मनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. या महान व्यक्तीमुळे आज देशात समता प्रस्थापित होताना दिसत आहे. तरी देखील अजूनही देशात अनेक ठिकाणी भेदाभेद दिसून येते. आपला भारत देश परत एकदा सुजलाम सुफलाम होण्यासाठी कवी संदेश देताना म्हणतो, 

*आपण सारे भेद टाळूया ।*

*विषमतेला मूठमाती देऊ या ।।*

लेखणी, शब्द माझे, जखम, बेधुंद, रणसम्राट, डोहात, वसंत, खुणा, थेंब, उठाव, मन, पत्ता, शराब, फसवून, दगाबाज, झोका या विषयावरील सर्वच चारोळ्या कमी शब्दांत खूप अर्थ सांगणारे आणि वाचकांच्या मनात खोल रुजणारे आहेत. राहिली हृदयात आणि निळे निशान हे दोन्ही गजल खूपच सुंदर आणि अर्थगर्भित आहे. त्याचसोबत अस्वस्थ, आग, उणीव, घोर, साखळदंड, भीमबाबा, पाऊस, जगणं, प्रीत, बेधुंद, उदास हात, टाकलं ठरवून, या विषयाच्या कविता देखील वाचनीय आहेत. संग्रहात एकूण 39 कविता असून सर्वच अर्थाने परिपूर्ण आणि प्रेमाची महती सांगणाऱ्या आहेत. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचा कवीचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. डॉ. प्रेरणा उबाळे यांनी या कवितासंग्रहाची प्रस्तावना केली आहे तर प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. गंगाधर मेश्राम, प्रा. योगिता कोकरे, प्रतिक्षा प्रजापती थोरात, भटू हरचंद जयदेव यांनी या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत. कवी नवनाथ रणखांबे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रेमी रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या भावी लेखनाला मनस्वी शुभेच्छा देतो. 


पुस्तक - प्रेम उठाव

कवी - नवनाथ रणखांबे

प्रकाशन - शारदा प्रकाशन, ठाणे

पृष्ठे - ६२

मूल्य - ९० ₹ 


पुस्तक परिचय - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News