*आपल्या कर्तव्यासह समाजाप्रती उत्तरदायीत्वाची भूमिका अधिक गरजेची* -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ▪️स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेड जिल्ह्यात बालकांमधील दृष्टीदोष व कर्णदोष विशेष तपासणी मोहिम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 27, 2021

*आपल्या कर्तव्यासह समाजाप्रती उत्तरदायीत्वाची भूमिका अधिक गरजेची* -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ▪️स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेड जिल्ह्यात बालकांमधील दृष्टीदोष व कर्णदोष विशेष तपासणी मोहिम





 *जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तळागाळापर्यंत वैद्यकिय सेवा-सुविधांसह शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी शासन यु‌द्धपातळीवर प्रयत्न करते आहे. नांदेड सारख्या विस्तीर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्याचे आव्हान दुर्लक्षुण चालणार नाही. बालकांमधील दृष्टीदोष व कर्णबधीर आजारांबाबत सहसा विशेष लक्ष दिल्या जात नाही. मात्र वेळीच उपचार जर झाले तर असंख्य मुलांची दृष्टी या मोहिमेतून वाचविता येईल. ज्या मुलांना ऐकायला येत नाही त्या मुलांच्या संभाषण व इतर उपचारावर या मोहिमेतून भर देता येणे शक्य होईल. जिल्हा प्रशासनाची टिम ही अत्यंत अत्यावश्यक मोहिम यशस्वीपणे राबवेल.* 

- पालकमंत्री अशोक चव्हाण


नांदेड (जिमाका) 27 :- लहान मुलांमधील दृष्टीदोष व कर्णदोष सारखे आजार हे वरवर पाहता लक्षात येत नाहीत. याबाबत मुलांनाही काही बोलता येत नसल्याने पालकांची ती सत्वपरीक्षा असते. तथापि बालकामधील काही शंकास्पद बाबी आढळल्या तर वैद्यकीय सल्ल्यानुसार उपलब्ध असलेले उपचार करण्यासाठी पालकांनी पुढे सरसावले पाहिजे. याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी ग्रामपातळीपर्यंत ज्या-ज्या व्यक्तींवर आहे त्या सर्वांनी केवळ नोकरीचा एक भाग म्हणून याकडे न पाहता आपल्या कर्तव्याचा, समाजाप्रती उत्तरदायीत्वाची आपली जबाबदारी आहे यादृष्टिने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. 


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, लॉयन्स क्लब, सुनो प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील बालकांमधील दृष्टीदोष व कर्णदोष विशेष तपासणी मोहिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या कार्यशाळेत‍ त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, बालरोग तज्ज्ञ डॉ. एल. एम. बजाज, लहान मुलांचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विष्णुकांत घोणसीकर, वैशाली दगडे, नित्यानंद मैया, श्रवण, वाचा व भाषा विकास तज्ज्ञ बालाजी देवकत्ते आदींची उपस्थिती होती.


आर.बी.एच.के.पथकातील तज्ज्ञ डॉक्टर, जिल्ह्यातील विशेष शिक्षक, औषध निर्माता, वैद्यकीय अधिकारी, संसाधन शिक्षक यांच्या सहभागातून संपूर्ण जिल्हाभर ही विशेष तपासणी मोहिम राबविली जाणार असल्याने त्यांनाही या कार्यशाळेस निमंत्रीत केले होते. बालकांमधील दृष्टीदोष व कर्णदोष हे कुपोषण, अनुवंशीक व इतर कारणांमुळेही असू शकतात. वेळेवरच उपचार जर केले तर अनेक बालकांची दृष्टी वाचविता येऊ शकते. याचबरोबर ज्यांना ऐकू येत नाही अशा महिन्याच्या आतील बालकांचीही तपासणी करता येऊ शकते. कोरोनाच्या प्रादुर्भावात हे आजरही दुर्लक्षूण चालणार नाहीत. कोरोना व्यतीरीक्त असे व कॅन्सरसारख्या आजाराबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिल्या.  



दृष्टीदोष व कर्णदोष तपासणी मोहिम ठरावीक काळापूरतीच मर्यादीत आहे असे नाही. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ग्रामीण भागाचा जर प्राधान्याने विचार केला तर यात सातत्याने पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. प्रत्येक गावात त्या-त्या तपासणी प्रमुखांनी प्रत्यक्ष हजेरी देऊन अशी बालके असतील तर त्यांची माहिती व नसतील तर तशी स्पष्ट लेखी माहिती दिली पाहिजे. प्रत्येक गावनिहाय हा डाटा संगणकीय प्रणालीला जोडला तरच त्यावर पुढील नियोजन करून आपल्या जिल्ह्यातील बालकांना या दोषातून सावरता येईल, असे ते म्हणाले.  


आपल्या गावात आरोग्यासंदर्भातील, महिला व बालकल्याणासंदर्भातील एखाद्या योजना त्रयस्थ संस्था जर राबवित असतील तर त्यात तेवढाच सजग सहभाग संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा असला पाहिजे. सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी ज्या जबाबदारीने कामे करतात ती जबाबदारी शासनातील प्रत्येक घटकांनी स्विकारली पाहिजे. आरोग्या सारख्या क्षेत्रात, लहान मुलांच्या दृष्टीदोष, श्रवणदोष सारख्या आजाराबाबत आपल्याला काम करता येणे ही नोकरी नाही तर ती एक मोठी संधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जाणीव करून दिली. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यातील प्राथमिक तपासणीचे हे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करू अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


या कार्यशाळेत बालकांच्या डोळ्याची तपासणी, आरोग्य तपासणी, बालकांच्या कानाची तपासणी, बालकांच्या आँडिओजिस्ट आणि बोलणे या विषयांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. एल. एम. बजाज, डॉ. विष्णुकांत घोणसीकर, डॉ. वैशाली दगडे, बालाजी देवकत्ते आदींने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अर्चना बजाज यांनी केले. डॉ. अविनाश वाघमारे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News