पंचशीलाचे आचरण हाच जगाच्या कल्याणाचा एकमेव मार्गः भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 23, 2022

पंचशीलाचे आचरण हाच जगाच्या कल्याणाचा एकमेव मार्गः भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो

 


औरंगाबादः तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील शांतीच्या मार्गाने नेते. पंचशीलाच्या आचरणामुळे व्यक्ती, समाज आणि देशात वैरभाव आणि कपटभावना संपुष्टात येते. असे झाले तर कुणीच कुणाचा राग, द्वेष करणार नाही आणि पोलिस, संरक्षण खात्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टाळून तो अन्य कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल. पंचशीलाचे आचरण हाच जगाच्या कल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे बांग्लादेशचे भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांनी म्हटले आहे.

      पूज्य भदंत अर्हत साधनानंद महाथेरो (बना भंते) यांचे सीमागुरू असलेले बांग्लादेशचे १३ वे संघराजा डॉ. ज्ञानश्री महाथेरो हे सध्या भारत भेटीवर आले आहेत.  ते ७८ वर्षांपासून भिक्खू जीवन जगत आहेत. मुंबईत आगमन झाल्यानंतर सध्या ते औरंगाबाद मुक्कामी आहेत. त्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकार यांच्या निवासस्थानी डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांच्यासह भिक्खू संघाला चिवरदान व अन्नदान करण्यात आले. त्यानंतर डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांची धम्मदेसना झाली. डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांनी बंगाली भाषेतून धम्मदेसना दिली. या धम्मदेसनेचा हिंदीतून अनुवाद भंते बोधीमित्र थेरो यांनी केला. यावेळी भंते ग्यानरक्षित थेरो, भंते के.बी. नंदपाल थेरो, भंते देवरत्न थेरो, भंते संघप्रिय थेरो यांची उपस्थिती होती.

       धम्मदेसनेत उपदेश करताना डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांनी बौद्ध धम्मातील त्याग परिमिता, दान परिमिताचे महत्व विषद केले. पंचशील शांतीच्या मार्गाने जायला शिकवते. वैरभाव, कपटभावना नाहिसा करते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक पुस्तक मी वाचले आहे. त्यात त्यांनीही पंचशीलाच्या आचरणाचे महत्व सांगितले आहे. पंचशीलाचे आचरण झाले असते तर लष्करी तुकड्या, पोलिस दले स्थापन करण्याची गरजच भासली नसती. लष्कर आणि पोलिसांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टळून तोच खर्च अन्य कल्याणकारी योजनांवर करता आला असता आणि त्यातून मानव जातीचे कल्याण साधता आले असते. परंतु पंचशीलाचे आचरणच झाले नसल्यामुळे या बाबींवर खर्च करण्याची वेळ आली आहे, असे भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो म्हणाले.

        आपण नुसतेच पंचशील म्हणतो. परंतु ते आचरणात आणत नाही. केवळ पंचशील म्हणणे महत्वाचे नाही तर ते आचरणातही आणले पाहिजे. धम्माच्या प्राप्तीसाठी त्यागभावना महत्वाची आहे. बुद्धाने असीम त्याग केला. त्या त्यागातूनच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. भिक्षा मागून धम्माचा प्रचार केला. सर्वांचे मंगल होण्यासाठी त्यागभावना महत्वाची आहे. आपण यथाशक्ती त्यागभावना जोपासली पाहिजे. तुम्ही दररोज जो भात शिजवता त्यातील एक मूठ तांदूळ काढून बाजूला ठेवा. दररोज बाजूला काढून ठेवलेले मूठभर तांदूळ महिन्याकाठी विकून गरजूंना मदत करा. तुमच्या दररोजच्या कमाईतून एक रुपया बाजूला काढून ठेवा. या जमा झालेला एक एक रुपया जिथे शाळा, विहार नसतील, तेथे शाळा, विहार उभारणीसाठी दान करा. दान यासाठी दिले पाहिजे की, दान देण्यातून त्याग भावना येते. ही त्यागभावनाच धम्माच्या मार्गाने जाण्यास सहाय्यभूत ठरते, असेही डॉ. ज्ञानश्री महाथेरो म्हणाले.

       आपण जन्माला आलो, तेव्हा सोबत काहीही घेऊन आलेलो नाही. नग्नावस्थेत आपला जन्म झाला. परंतु जन्माला येताना आपण बोलणे, ऐकणे, पाहणे, विचार करणे असे गुण घेऊन आलो आहोत. जन्माला आलेले प्रत्येक शरीर एक दिवस मरणार आहेच. या शरीराने हिंसा, चोरी आणि व्याभिचार करू नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलावर ज्या भावनेतून प्रेम करता त्याच भावनेतून अन्य मानव-प्राण्यांवरही प्रेम करा. कुणाचाही रागद्वेष करू नका. वाईट मार्गाने पैसा कमवू नका. कुशल कार्य करा. कुशल कार्य केल्याने तुम्ही दुर्गतीला जाणार नाही. तुमच्या मनात कपट भावना निर्माण होणार नाही. त्यामुळे कुणीच कुणाचा वैरी राहणार नाही. मग चोऱ्या, हत्या, हिंसाही होणार नाहीत आणि कोर्टकचेऱ्यांची गरजही संपुष्टात येईल, असेही भंदे डॉ. ज्ञानश्री महाथेरो म्हणाले.

     यावेळी इंजि. बी. के. आदमाने, इंजि. बाबुराव म्हस्के, इंजि. भारत कानिंदे, वनिता सातदिवे, वसंत सातदिवे, इंजि. रमेश शिंदे, बाबुराव कदम, प्रकाश गायकवाड, ऍड. जयश्री भगत, जितेंद्र भवरे यांच्यासह उपासक- उपासिकांची उपस्थिती होती.


शनिवारी स्वागत सत्कार व पूजा वंदना


भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांची जाहीर धम्मदेसना, स्वागत सत्कार आणि पूजा वंदनेचा कार्यक्रम शनिवारी २५ जून रोजी दुपारी ४ ते ६ यावेळेत भानुदास चव्हाण सभागृह, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबादेतील उपासक उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांनी केले आहे.



औरंगाबाद : पूज्य भदंत अर्हत साधनानंद महाथेरो (बना भंते) यांचे सीमागुरू असलेले बांग्लादेशचे १३ वे संघराजा डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांना चिवरदान व अन्नदान करताना कार्यकारी अभियंता अशोक येरेकार आणि आशा येरेकार.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News