अलविदा शाहीर ... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 18, 2023

अलविदा शाहीर ...

 


अलविदा शाहीर  ...

---------------------

" आरं ही मांगाची मांगाई

 हिला रयाच राहिली नाही 

पिढ्यान् पिढ्या गेल्या 

मांग वरी आला नाही

पिढ्यानपिढ्या गेल्या

मांग वरी आला नाही " या शाहीर दिगंबर घंटेवाड यांच्या गाण्याने एकेकाळी मराठवाड्यात रान पेटविले होते. 

       १९८० चे दशक होते. मराठवाड्यात गावोगाव भीमजयंत्यांबरोबर अण्णा भाऊ साठे जयंत्यांही सुरु झालेल्या होत्या. गावाच्या पूर्वेला गावाची सेवा करत लाचारीचं जीवन जगत असलेले मांगवाडे हजारो वर्षांच्या झोपेतून जागे झाले होते. कारण या काळात मांगाची पहिली पिढी शिकून तयार होत होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात थोड्या फार प्रमाणावर मराठवाड्यातील मातंग तरुण उच्च शिक्षण घेत होते. या तरुणांनी 'महाराष्ट्र युवक परिषद' ही संघटना स्थापन केली होती. तात्यासाहेब भिंगारदिवे, बाबुराव भारस्कर, स्वातंत्र्यसैनिक देवराव कांबळे, मातंग गुरुजी अशी राजकारणी मंडळी काँग्रेसच्या तालमीत तयार होत होती. तर याच काळात डॉ. बाबासाहेब गोपले, राम गुंडीले, नानासाहेब कांबळे, हरीबाई कांबळे,मधुकर कांबळे, लक्ष्मण ढोबळे, एकनाथ आव्हाड , जी.एस. कांबळे  अशा प्रकारचे सामाजिक राजकीय कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर तयार होत होते. याच काळात शाहीर दिगंबर घंटेवाड आणि शाहीर गंगाधर वाघमारे यांचे कलापथक परभणी जिल्ह्यातील गावागावातून प्रबोधनाचा जागर घालत होते.

     शाहीर दिगंबर घंटेवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील नायगाव खैरगावचे. तर त्यांचे साथीदार शाहीर गंगाधर वाघमारे हे देगलूर तालुक्यातील एका खेडेगावचे. दोघेही आपापल्या गावातून सत्तरच्या दशकात दुष्काळात नांदेडला येऊन स्थायिक झाले.  नवीन सिडको बळीरामपूर भागात दोघांनीही आपले घरटे उभारले. दोघेही एडवोकेट राम वाघमारे यांच्यासोबत अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे काम करत होते. त्या काळात नांदेड आणि परिसरात संघर्ष समितीचे कार्य जोरदारपणे सुरू होते आणि या कार्याला दोन शाहिरांची जबरदस्त साथ होती. 

     १९९० च्या आसपास वीस वर्षांतच सर्व दलित, बहुजन, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या  चळवळीचा जोर प्रचंड वेगाने ओसरला. कार्यकर्त्यांना पुन्हा वाईट दिवस आले. चळवळी थंडावल्या नेते गारद झाले. कार्यकर्ते चौदिशा विखुरले. ज्यांच्या भूमिका डळमळीत होत्या; ते चळवळ सोडून आपल्या पोटा पाण्याला लागले. मात्र ज्यांच्या भूमिका आणि निष्ठा पक्क्या होत्या ; असे दिगंबर घंटेवाडांसारखे कार्यकर्ते स्वतःला बदलून पुन्हा नव्याने चळवळीत सामील झाले.

    नांदेड मधील पीपल्स महाविद्यालयात दिगंबर घंटेवाड यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी दशेतच ते  सामाजिक चळवळीत सक्रिय झाले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. दलित, वंचितांवरील विविध अत्याचारांच्या प्रकरणात त्यांनी अनेकदा सरकारला धारेवर धरलेले आहे. चळवळीचे दिवस बदलले तरी घंटेवाडांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत चळवळीची साथ सोडली नाही. चरितार्थासाठी सुरुवातीला त्यांनी नांदेड येथील नांदेड टेक्स्ट टाईल्स मिलमध्ये काम केले. हे काम करत असतानाच त्यांची चळवळ जोमात होती. मिल बंद पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. प्रबोधन प्रकाशन संस्था सुरू केली. अनेक नव्या जुन्या लेखकांची पुस्तके त्यांनी नेटाने प्रकाशित केली. प्रकाशन व्यवसायात उतरल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंजून काढला. जिथे जिथे परिवर्तनवादी साहित्य संमेलने, विचार सभा, चर्चासत्रे होत असत, तिथे तिथे नांदेडहून दिगंबर घंटेवाड आपल्या पत्नीसह पुस्तकांचे गठ्ठे घेऊन विक्रीसाठी हमखास जात असत. बुद्ध, बसव, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे विचारांवर त्यांची प्रचंड निष्ठा होती. 

      मातंग आणि तत्सम वंचित जात समूहांना बुद्ध बसव शिव शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ साठे विचारधारेवर आणण्यासाठी दिगंबर घंटेवाड हे आयुष्यभर कार्यरत राहिले. अहमदपूर जवळील खेडेगाव ही त्यांची सासरवाडी तर उदगीर ही त्यांच्या एका मुलाची सासरवाडी. त्यामुळे दिगंबर घंटेवाडांशी माझा नेहमीच जवळून संपर्क होत असे. अहमदपूरला आले की ते मला कॉलेजमध्ये भेटत असत आणि उदगीरला आले की हमखास घरी येऊन भेटत असत.  त्यांचे मित्र गंगाधर वाघमारे हेही लेखक बनले. त्यांची ही पुस्तके प्रबोधन प्रकाशनाकडून प्रकाशित केली. शाहीर घंटेवाड यांनीही लेखणी उचलली. स्वतःच्याच प्रबोधन प्रकाशनाकडून त्यांनी स्वतः लिहिलेली, संपादित केलेली वीसेक पुस्तके प्रकाशित केली होती. एकदा मुंबईत एक मे रोजी आमची भेट झाली. मलबार हिल परिसरातील राजभवनावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर एक कार्यक्रम आयोजित केला होता तो पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. राजभवनाच्या प्रवेशद्वारावर त्यांनाही पोलिसांनी अडवले आणि आम्हालाही. त्यांना महाराष्ट्र शासनाने दलित मित्र, समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविलेले असतानाही राजभवनाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस त्यांना मध्ये सोडत नव्हते. वयाची सत्तरी गाठलेल्या या तरुणाची जिद्द पाहून आम्ही अचंबित झालो होतो. शेवटी पोलिसांशी झगडून त्यांनी आत प्रवेश मिळविलाच. असे बहाद्दर कार्यकर्ते होते दिगंबर घंटेवाड..! 

   त्यानंतर अनेकदा आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. गेल्या वर्षी जिंतूरला आयोजित केलेल्या अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो, तिथे प्रवेशद्वारावरच दिगंबर घंटेवाड आणि त्यांच्या पत्नी ही दोघेही पुस्तकांच्या दुकानावर मला भेटले. आणि तुमचं अध्यक्षीय भाषण मी छापणारच म्हणून त्यांनी तिथे जाहीर केले. आपलं एक तरी पुस्तक प्रबोधन प्रकाशनाकडून प्रकाशित व्हावे अशी माझीही इच्छा होती आणि ते काम फत्ते झालं. माझं अध्यक्षीय भाषण अत्यंत देखण्या स्वरूपात घंटेवाडांनी प्रकाशित केलं. 

       अगदी लहान वयात मी त्यांची गाणी ऐकली होती. शाहीर घंटेवाड आणि शाहीर वाघमारे ही जोड गोळी मनात कायम घर करून बसलेली होती. अधून मधून फोनवर आमचा नेहमी संपर्क व्हायचा. मी त्यांना चळवळीच्या आठवणी आत्मकथनाच्या रूपात लिहायला सुचवलं होतं. पण त्यांचा व्याप खूप होता. पुस्तकं प्रकाशित करणं ती विकणं, त्यासाठी गावोगाव फिरणं वयाच्या पंच्याहत्तरीतही सुरूच होतं. 

    मागच्या भेटीत मला म्हणाले होते सर, आम्ही घर बांधायला काढलंय... तुमचं लक्ष असू द्या..! आता काय लक्ष द्यावं..? तुम्ही असं अचानक आम्हाला पोरकं करून जाल असं वाटलं नव्हतं घंटेवाड साहेब..! तुमच्याकडे चळवळीचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास होता. तुम्ही अनेक ग्रंथ लिहिली आणि अजूनही तुम्हाला खूप लिहायचं होतं... समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर आणण्यासाठी तुमची धडपड अखेरपर्यंत सुरूच होती... 

      खरं म्हणजे जाती-पाती, धर्म, वर्ग हे सगळे भेद ओलांडून तुम्ही सम्यक सम्बुद्धाच्या दिशेने पुढे निघाला होता... आज पहाटे काळाने अचानक घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं...! तुमच्या जाण्याने कधीही न भरून निघेल अशी पोकळी निर्माण झाली आहे...जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली..!!


                     - डॉ. मारोती कसाब

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News