राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 11, 2022

राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची

प्रभावी अंमलबजावणी करा 

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       अकरा लाख प्रवाशांचा टप्पा पार करून शिर्डी विमानतळाने केली गौरवास्पद कामगिरी

·       व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. या कामगिरीबद्दल 'बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर' या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केले.

             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज  वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे, दूरदृश्यप्रणालीद्वारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, नागपूर महापालिका आयुक्त बी.राधाकृष्णन, नागपूर सुधारणा ट्रस्टचे अध्यक्ष मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला या बैठकीला उपस्थित होते.

               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.तसेच शिर्डी  येथून कार्गोने भाजीपाला,फुले व फळे हे बंगलोर,चेन्नई व दिल्ली येथे  पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डी वरून कार्गोने १ लाख ७० हजार किलो पर्यंतचा शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला ही कौतुकाची बाब आहे. शिर्डी बरोबरच इतर जिल्ह्यातील सुरू असलेली विमानवाहतूक सेवा दर्जेदार असावी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लक्ष द्यावे. मिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे गतीने करावीत.समृद्धी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत. पालघर येथे सॅटेलाईट विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            यावेळी  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सद्यस्थितीत एमएडीसीमार्फत सुरू असलेले  व भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम, मिहानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्रशासनाची उडाण योजना राबविण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी माहिती दिली.

         यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणेकरून एकाच यंत्रणेकडे विमानसेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असेही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News