भारतीय राष्ट्रध्वज ; आपल्या अस्तित्व व सार्वभौमत्वाचे प्रतिक -बालासाहेब लोणे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, August 14, 2022

भारतीय राष्ट्रध्वज ; आपल्या अस्तित्व व सार्वभौमत्वाचे प्रतिक -बालासाहेब लोणे

 


            भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा, आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्याला राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे व सार्वभौमत्वाचे प्रतिक आहे. भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी स्विकारला गेला. कोणत्याही राष्ट्राचा राष्ट्रीय ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं.

     देश विदेशात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय,स्पर्धा, परिषदांत भारतीय राष्ट्रीय ध्वज अतिशय डौलाने व अभिमाने फडकत भारताच्या अस्तित्व जागतिक पटलावर अधोरेखित करून व समस्त भारतीयांच्या प्रतिनिधीत्वाची साक्ष मिरवितो. भारतीय राष्ट्रध्वज निर्मिती व स्विकृतीला  व त्याच्या रचनेला अतिशय रंजक असा इतिहास व वारसा आहे. काळानुरूप स्वातंत्र्य पूर्व काळापासुन ते स्वातंत्र्योत्तर काळात यात बदल व परिवर्तन झाल्याचे आपल्या निदर्शनात येते.

   भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग असतात ? असा बाळबोध प्रश्न विचारल्यास आपण विचारणाऱ्यालाच हा काय प्रश्न झाला का ? असे म्हणणार कारण आपल्याला माहित आहे की, भारतीय राष्ट्रध्वजात तीन रंग असतात म्हणून तर तिरंगा म्हणतात कारण हीच बाब आपणांस शाळा व यंत्रणेमार्फत वर्षोनवर्ष बालवयापासुन आपल्याला शिकविली आहे व मनावर बिंबविली गेली आहे. मुख्यत्वे राष्ट्रध्वजात केसरी, पांढरा व हिरवा तीन रंग दिसत असले तरी तिन रंगाच्या एकदम मध्यभागी असलेल्या अशोकचक्राचा गडद निळा रंग मात्र चौथा रंग म्हणून मोजताना आपण नेमके विसरतो. वास्ताविक रंग आणि डिझाईनचा विचार केल्यास भारताचा राष्ट्ध्वजात केवळ तीन रंगाचाच समावेश नसुन केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा असे चार रंग आहेत. एकंदरीत राष्ट्रध्वजातील रंगाचाच विचार केला तर केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा असे चार रंग आहेत. तिरंगा नसून चौरंगा (चौरंगी) असाही आपण म्हणू शकलो असतो पण तसा प्रघात पडलेला नाही. खरे तर कागदोपत्री यास केवळ भारतीय राष्ट्रध्वज ( Indian National Flag) असे संबोधले जाते. परंतू नेहमीच्या बोली प्रघातान्वये आपण त्यास तीन  रंगावरून तिरंगा असेही म्हटले जाते.

          भारतीय राष्ट्रध्वज निर्मितीला एक एैताहासिक पार्श्वभूमी आहे. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला एक स्वतंत्र राष्ट्रध्वज असावा व  भारताचा राष्ट्रध्वज ठरविण्यासाठी डॉ.राजेंद्र प्रसाद  यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ध्वज समिती निर्माण करण्यात आली. या भारतीय राष्ट्रध्वज समितीमध्ये स्वतः भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, के.एम मुन्शी, के.एम पाणीकर आणि ओ.सी.राजगोपालाचार्य यांचा  समावेश होता.

          भारतीय राज्यघटना मसुदा समिती व राष्ट्रध्वज निवड समितीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभासद होते. त्या वेळी राष्ट्रध्वज कोणत्या स्वरूपाचा असावा याविषयी सर्वत्र चर्चा सुरू होती. या बाबतीत काही महाराष्ट्रीय नेत्यांनी आणि मुंबई प्रांतिक हिंदुसभेच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेवून राष्ट्रीय ध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करावेत अशी विनंतीवजा  सूचना अनंतराव गद्रे, प्रबोधनकार  केशवराव ठाकरे आणि गावडे यांनी केली होती व समितीत बहुमताने वा एकमताने हा विषय कायम होत असेल तर माझा आक्षेप असणार नाही असे अभिवचन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या शिष्टमंडळाला दिले होते. १० जुलै १९४७ ला जेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जायला निघाले तेव्हा सांताक्रूझ विमानतळावर मुंबई प्रांतिक हिंदुसभेचे नेते आणि काही मराठे पुढारी यांनी आंबेडकर विमानात बसायला जाताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एक भगवा ध्वज अर्पण केला. भगव्या ध्वजासंबंधी तर चळवळ झाली, तर त्याला आपण पाठिंबा देवू असे त्यांनी त्यांना अभिवचन दिले. त्या वेळी मुंबई हिंदुमहासभेचे नेते रावबहादूर सी.के.बोले, अनंतराव गद्रे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विनोदाने म्हणाले की, ‘‘एका महाराच्या मुलाकडून घटना समितीवर भगवा ध्वज लावण्याची अपेक्षा तुम्ही करता आहात नाही का ?’’ हिंदुमहासभेमधून ध्वज पिवळ्या रंगाचा असावा व त्यात तलवार असावी असे मत मांडले गेले होते तर मुस्लिम नेत्यांनी हिरवा ध्वज व त्यात अर्धचंद्र आणि त्यावर चांदणी असावी तर, कम्युनिस्टांनी लाल रंगाच्या ध्वजाची मागणी केली. हिंदू नेत्यांनी भगवा रंग असलेला ध्वज व त्यात ओम ची प्रतिकृती तर काँग्रेस आणि गांधीजी यांनी तिरंगा आणि त्यात चरखा असलेल्या ध्वजाची मागणी केलेली होती.

       यातील प्रत्येक सदस्य अतिशय बुध्दीमान व चौकस होते. प्रत्येक सदस्याने आपापल्या परीने भारताचा कोणता ध्वज असावा या संबंधी सूचना केल्या व त्यावर  डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व संविधान सभेत सखोल चर्चा करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रध्वज समितीत भाषण करताना म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात कोण्या एका जात, धर्म,पंथ किंवा संप्रदायानेच भूमिका बजावली नसून सर्व धर्माच्या लोकांनी यात मोठा सहभाग घेतला होता, म्हणून कोणत्याही एका धर्माला अनुसरून राष्ट्रध्वज ठरविणे योग्य नाही. राष्ट्रध्वज स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचे प्रतिक असल्याचे प्रतिबिंबित व्हायला हवे. राष्ट्रध्वजात समाविष्ट चौरंगी असलेल्या ध्वजामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे, वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो तर,मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो, तर,निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते यात बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांचे ते प्रतिक आहे. याद्वारे ते दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. सरतेशेवटी याच दिवशी सर्वानुमते चार रंग व मध्यभागी अशोकचक्र असलेला राष्ट्रध्वज समितीने "तिरंगा राष्ट्रध्वज" महणून घोषित करून स्वीकारण्यात आला. राष्ट्रध्वज समितीने घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी व त्यावर गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. मुख्यत्वे तीन रंगावरून भारतात "तिरंगा" हा शब्द बहुधा नेहमीच भारतीय राष्ट्रीय ध्वजाला सूचित करतो परंतू पत्यक्षात भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे फक्त रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा किंवा चौरंगी आहे.

     भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी प्रथमतः भारतीय अन अंतिमतःही भारतीयच आहे. प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशाची आन बाण अन शान असलेल्या राष्ट्रध्वजाचा गर्व व अभिमान आहेच. भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्यही आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपणां सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय भारत.

  - बालासाहेब लोणे, नांदेड

      9421756489 (Wts)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News